शिंदेसेनेच्या खासदाराची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

Share

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांमध्येही आपल्या खासदाराची वर्णी लावण्यासाठी, त्या त्या पक्षांचे वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून, शिंदे गटात विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्यापैकी एका खासदाराच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची माळ पडू शकते, अशी चर्चा सुरू आहे. या बंडखोरांपैकी किमान एका खासदाराची वर्णी लागेल, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांमध्ये परभणीचे बंडू जाधव यांचाही समावेश आहे. नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन, आपल्या पक्षाने आपले नाव सुचविल्यास, केंद्रात संधी मिळू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमडंळ विस्तारात मोठे आणि महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशीही चर्चा चालू आहे. शिंदे गटाच्या वाट्यालाही एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद येऊ शकते. तथापि, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्त्व कोणाची निवड करणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *