बोगस बियाणे रॅकेटला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोप; महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रसारासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान
आर्वी: भारतीय जनता पक्षाचा खरा अजेंडा ‘वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी’ असून संविधान कमकुवत करून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आर्वी येथे आयोजित बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विजय वडेट्टीवार, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, किशोर कान्हेरे, भानुदास माळी, अनंत मोहोड, सुनील कोल्हे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सपकाळ यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या समता, सामाजिक न्याय व संविधानिक मूल्यांचा राज्यभर प्रचार करण्यासाठी काँग्रेसकडून वर्षभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली.
विजय वडेट्टीवार यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या अधिकारांवर संकट असल्याचा आरोप करत शेतकरी, बेरोजगारी व महागाईच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय ध्रुवीकरणावर टीका करत समतावादी विचारांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली, तर यशोमती ठाकूर यांनी ओबीसी समाजाचा राजकीय वापर झाल्याचा आरोप करत काँग्रेस समाजाच्या बाजूने उभी असल्याचे सांगितले.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील बोगस बियाणे रॅकेटला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पेपरफुटी, बोगस पदव्या आणि विविध घोटाळ्यांमुळे व्यवस्था पोखरल्याचा आरोप करत काँग्रेस राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.