नवी दिल्ली: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण होण्याची चर्चा सुरू असतानाच त्यात अडथळे निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने वेगळा राजकीय डाव आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातील भेटीगाठींमधून या हालचालींचे संकेत मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रारंभी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर दिल्लीतील नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्या संदर्भातील फोटो आणि माहिती सोशल मीडियावरही शेअर केली. मात्र अलीकडील भेटीगाठींमुळे या दौऱ्यामागे वेगळेच राजकीय गणित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सोनिया गांधी यांची भेट
दिल्ली दौऱ्यात रोहित पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.या भेटीत अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या भेटीच्या फोटोंमध्ये खासदार सुप्रिया सुळे दिसत नसल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
दिल्लीतील वाढता संपर्क
दिल्ली दौऱ्यात रोहित पवार यांनी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेतली. त्यामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांचा समावेश आहे.
तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते P. चिदंबरम आणि दिग्विजया सिंग यांच्याशीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
विलीनीकरणाचा ‘दुसरा पर्याय’?
राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण सध्या कठीण दिसत असल्याने पर्यायी राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असू शकते. अशा परिस्थितीत काँग्रेसशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
या सर्व भेटीगाठींमागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत अधिकृत भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र रोहित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.