मोठ्या माणसांच्या सहवासात रहा : म.भा.चव्हाण

vallari-prakashan-shevanti
Share

पुणे : आपली कविता अधिक प्रगल्भ आणि व्यापक बनवायची असेल, तर नवोदित कवींनी मोठ्या माणसांच्या, मोठ्या कवींच्या सहवासात रहायला हवे, त्यातूनच आपल्या विचारांची व्याप्ती वाढते आणि आपण अधिक प्रगल्भ लिहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी केले.

वल्लरी प्रकाशनाने प्रकाशित केलेली आणि प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादित केलेल्या ‘शेवंती’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात चव्हाण बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवयित्री केतकी देशपांडे आणि वल्लरी प्रकाशनाच्या सल्लागार मानसी चिटणीस, संपादक प्रज्ञा कल्याणकर आणि सल्लागार व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.

‘शेवंती’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात एकूण अकरा कवी-कवयित्रींचा समावेश आहे. त्यामध्ये अनुपमा भंडारी (लातूर), वैशाली मिसाळ (पुणे), श्रीराम टिळक (पुणे), प्रा.व्ही.एम.भुसे (नाशिक), अभिजित जगताप (वाई), डॉ. विजयसिंह परदेशी (पुणे), अशोक होनराव (पुणे), शिवकांत कुमरे (नांदेड), वर्षा बहिरट (पुणे), आरती कोचरेकर (ठाणे), डॉ. पुष्पा तायडे (नागपूर) यांच्या कवितांचा समावेश आहे. संपादकांचे मनोगत आणि पुस्तक प्रकाशनानंतर सहभागी कवींचा काव्यमहोत्सव संपन्न झाला. त्यानंतर केतकी देशपांडे यांनी आस्वादात्मक रसग्रहण केले. त्या म्हणाल्या, ‘‘कविता लिहून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात याचं कौतुक आहे. आता पुढे जाण्यासाठी लिहिण्यात सातत्य ठेवावे. सतत वाचत रहावे. वल्लरीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चिटणीस यांनी केले. तर प्रज्ञा कल्याणकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती मनोहर, आर्या इनामदार, माया कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.

‘‘नव्या कवी-कवयित्रींना व्यासपीठ देण्यासाठी वल्लरी प्रकाशनाने प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यभरातील कवींना पुण्यात व्यासपीठ उपलब्ध होत आहे. अवघ्या साडे तीन वर्षांच्या आत या उपक्रमातील ‘शेवंती’ हा वीसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. हा मराठी साहित्य सृष्टीतील पहिलाच अत्यंत अनोखा, सातत्यपूर्ण आणि यशस्वी प्रयोग आहे. जोपर्यंत आम्ही साहित्य क्षेत्रात कार्यरत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करत राहणार आहोत’’ अशा शब्दांत प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादकीय भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *