बार्शी: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांना सभेतच थेट ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“खाते कोणाचेही असो, मी उपमुख्यमंत्री आहे. टेन्शन घेऊ नका, टेन्शन द्यायचं काम माझं आहे. दिलीप सोपल सात वेळा निवडून आले आहेत, आठव्यांदा देखील निवडून येतील. मागच्या वेळी झालेली चूक दुरुस्त करू. सोपल साहेबांचा मान-सन्मान राखला जाईल. तुम्ही आमच्यासोबत या, लगेच संतनाथ कारखाना सुरू करू,” असे जाहीर वक्तव्य शिंदेंनी सभेत केले.
बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची चर्चा असली तरी याबाबत कोणत्याही नेत्यांकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट दिलीप सोपल यांच्यासाठी सभा घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावेळी शिंदे म्हणाले, “दिलीप सोपल यांचे काम मी अनेक वर्षे विधानसभेत पाहिले आहे. दोन वेळा ते सभागृहात नव्हते, तरी सभागृहाला त्यांची उणीव जाणवत होती. ते सर्वांचे मित्र आहेत. १९९५ मध्ये मंत्री होते. कामाचा माणूस आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “राज्यात दुःखाचे सावट आहे. मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्तेच आम्हाला निवडून देतात. नेता कार्यकर्त्यांच्या जवळ असला पाहिजे. कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा मी माणूस आहे. सोपल मनापासून दोस्ती निभावतात, म्हणूनच मी इथे आलो आहे.”
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले, “कोणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मी गरिबी पाहिली आहे, त्यामुळे गरिबीची जाण आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करत आहोत. कर्जमाफीचे आश्वासन दिले असून समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी केली जाईल.”
बार्शीच्या विकासाबाबत आश्वासन देताना त्यांनी स्पष्ट केले की, “बार्शीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. दिलीप सोपल यांची गाडी चुकली नसती, तर ते आज मंत्रिमंडळात असते. मी जे बोललो आहे, त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे होणार नाही.”