मुंबई: शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महायुतीत राजकीय खळबळ उडाली आहे. “मुख्यमंत्री माझ्यासारख्या २४२ आमदारांमुळे आहेत” असे म्हणत बाबर यांनी भाजप नेत्यावर टीका केली होती. या वक्तव्यावरून भाजपकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सुहास बाबर यांना थेट इशाराच दिला आहे.
सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं असल्याचं सांगत गिरीश महाजन म्हणाले, “मी आताच चॅनेलवर त्यांचे वक्तव्य पाहिले. ज्या भाषेत ते बोलत आहेत, ती अतिशय आक्षेपार्ह आहे. ही त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांच्या राजकारणाची अजून सुरुवात आहे, त्यामुळे त्यांनी तोलूनमापून बोललं पाहिजे.”
महाजन पुढे म्हणाले, “स्वर्गीय अनिल बाबर हे माझे चांगले मित्र होते. ते अनेक वर्षे सभागृहात होते, पण त्यांनी कधीही असा तोल सोडला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव सुहास बाबर मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत बोलत आहेत, हे अतिशय गंभीर आहे. सर्व पक्ष माझ्या खिशात आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे.”
सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर टीका करताना महाजन यांनी एकनाथ शिंदेंनी त्यांना समज द्यावी, अशी मागणीही केली. “अशा प्रकारे बोलत राहिले, तर सुरुवातीलाच शेवट होऊ शकतो. भाजपाला कोणी खिशात घेऊ शकत नाही. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरू नये,” असा स्पष्ट इशारा गिरीश महाजन यांनी दिला.या घडामोडींमुळे शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.