मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा दावा केला आहे.मात्र, दुसरीकडे अजित पवार गटातील नेते अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकत्रीकरण होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शरद पवार गटाची सावध भूमिका
विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर सध्या कोणतेही विधान करू नये, अशा स्पष्ट सूचना पक्षाच्या प्रवक्त्यांना व नेत्यांना देण्यात आल्या आहेत.राजकीय वातावरण तापलेले असताना पवार गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या परिषदेकडे लागले आहे.
विलीनीकरणावर प्रफुल्ल पटेल यांची स्पष्ट भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला.पटेल म्हणाले,“मी केवळ आमच्या पक्षाबाबतच बोलेन. कोणत्याही काल्पनिक चर्चांवर प्रतिक्रिया देणार नाही. अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने मी पक्षातील ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या निर्णयांशी सुसंगत होती. २०२३ मध्ये आम्ही ठराविक निर्णय घेतला आणि सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी पुढे चालली आहे.”
विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही – पटेल
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.ते म्हणाले,“अजित पवार यांनी याआधी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट सांगितले आहे की विलीनीकरणाबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अशी चर्चा झाली असती तर आम्हाला माहिती नसणे शक्यच नव्हते. आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार गटासोबत युती होती.”
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दावे होत असताना, शरद पवार गटाने घेतलेली मौनाची भूमिका आणि रोहित पवारांची आगामी पत्रकार परिषद यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य कोणत्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.