भाजपाने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू! गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Share

मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या असल्या तरी, निवडणूकपूर्वी नवी मुंबईत रंगलेला भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणूक निकालानंतर वाद निवळेल, अशी अपेक्षा असतानाच गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत थेट एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले आहे.

“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे,” असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी खळबळजनक विधान केले. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याचे अधोरेखित करत, “पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही तो मान्य केला. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी सहन केले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

MMR मध्ये स्वतंत्र लढतीचा प्रस्ताव

गणेश नाईक यांनी सांगितले की, निवडणुकांपूर्वी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. “ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) महायुतीतील सर्व पक्षांना स्वतंत्रपणे निवडणूक लढू द्यावी. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी,” असे मत त्यांनी मांडले होते.

फडणवीसांशी चर्चा, मात्र ठोस निर्णय नाही

या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही नाईक यांनी सांगितले. “मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यांनी ना होकार दिला, ना नकार. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, पण काही ठिकाणी ती मिळाली नाही,” असे नाईक म्हणाले.

नवी मुंबईत 57 जागांची मागणी, वाद शिगेला

नवी मुंबईतील जागावाटपावर बोलताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. “नवी मुंबईत शिवसेनेकडून 57 जागांची मागणी होती. आम्ही त्यांना 20 ते 22 जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले. त्यानंतर जे झालं, ते चांगलंच झालं,” असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, “ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तसेच झाले. तरीही पक्षाला जे मान्य होते, ते आम्ही मान्य केले,” असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून दिली.

‘भाजपा शिस्तीचा पक्ष आहे’

“भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की दुसरा विचार होत नाही,” असे सांगत गणेश नाईक यांनी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांची परवड उघडपणे मांडली. “हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली, हे कौतुकास्पद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

नाईक यांच्या या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, येत्या काळात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंधांवर याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *