मुंबईत बिहार भवन उभारणीवरून राजकीय रणधुमाळी

Share

मनसे-ठाकरे सेनेचा विरोध, बिहार सरकार ठाम; ३० मजली इमारतीला ३१४ कोटींची मंजुरी

मुंबई: मुंबईत प्रस्तावित बिहार भवन उभारणीवरून सध्या महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात जोरदार वाद निर्माण झाला आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, प्रत्युत्तरात बिहारमधील जेडीयू आणि भाजप नेत्यांनी “बिहार भवन कोणत्याही परिस्थितीत उभे राहणारच” असा ठाम इशारा दिला आहे.या वादाला अधिक धार देत बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.“बिहार भवनचे काम थांबवण्याइतकी ताकद कोणामध्येही नाही. हा देश कुणाच्या मक्तेदारीचा नाही,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना “निरुपयोगी व्यक्ती” म्हणत वादग्रस्त विधान केले.

“हा राजकीय अजेंडा नाही, मानवी गरज”; अशोक चौधरी

अशोक चौधरी म्हणाले,“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजे आहेत का? ‘नाही बनू देणार’ असं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? बिहार भवन उपचारांसाठी महाराष्ट्रात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. हा प्रकल्प मानवतेचा आहे, राजकारणाचा नाही.”त्यांनी स्पष्ट केले की, भविष्यात इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची भवनं उभारण्यात येणार असून, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.

ठाकरे गटाचा आक्षेप; “मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया”

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र या प्रकल्पाला स्थानिक संसाधनांवर ओझे आणि प्रादेशिक राजकारणातून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

पक्षाचे नेते विनायक राऊत म्हणाले,“मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुजरात भवनही बांधतील.”खासदार संजय राऊत यांनी सांगितले की,“मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे या विषयावर भूमिका मांडणे आणि गरज पडल्यास निषेध करणे ही आमची जबाबदारी आहे.”

शिंदे गटाचा विरोधाला विरोध

शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मात्र या मुद्द्याचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे सांगितले.“ही इमारत कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. मानवतेच्या प्रकल्पाला विरोध करणे दुर्दैवी आहे,” असे निरुपम म्हणाले.

बिहार भवनची वैशिष्ट्ये काय?

दरम्यान, बिहार फाउंडेशन (मुंबई) चे अध्यक्ष कैसर खालिद यांनी सांगितले की, बिहार भवनच्या माध्यमातून मुंबई–बिहार उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी रणनीती आखली जाईल.इमारत बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी स्पष्ट केले की, ही इमारत पर्यावरणपूरक असेल.

प्रकल्पाची ठळक माहिती

स्थान : दक्षिण मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेट (मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन)

उंची : तळघरासह ३० मजली, अंदाजे ६९ मीटर

खर्च : ३१४.२० कोटी रुपये (प्रशासकीय मंजुरी)

खोल्या : एकूण १७८

विशेष सुविधा

बिहारमधील रुग्ण व नातेवाईकांसाठी २४० खाटांचे वसतिगृह

कर्करोग व गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबईत येणाऱ्यांना दिलासा

राजकारण विरुद्ध मानवता?

एकीकडे स्थानिक राजकीय पक्षांचा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा, तर दुसरीकडे बिहार सरकारचा मानवी गरजांवर आधारित प्रकल्पाचा दावा — या संघर्षामुळे बिहार भवनचा प्रश्न आता केवळ बांधकामापुरता मर्यादित राहिला नसून, तो राजकीय प्रतिष्ठेचा आणि संघराज्यात्मक अधिकारांचा मुद्दा बनला आहे.आता या प्रकल्पावर पुढे काय निर्णय होतो आणि मुंबईत प्रत्यक्षात बिहार भवन उभे राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *