मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपने लक्षणीय कामगिरी केल्याने स्थानिक पातळीवर पक्ष अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहीत, “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं… पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना मंत्री जयकुमार गोरे यांनी “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वह भी टांग ऊपर” अशा शब्दांत टीका केली. या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात तीव्र पडसाद उमटत असून काँग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदवर भाजप सरकार” असा नारा देत भाजपने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठकींचा सिलसिला वाढला असून, महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीतही यश मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र, जयकुमार गोरे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सोलापूरचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.