चूक असेल तर मी राजीनामा देतो; संजय जाधवांचे पालकमंत्र्यांना थेट आव्हान

Share

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुका अखेर पार पडल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढताना दिसली, तर काही महानगरपालिकांमध्ये घटक पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले होते. निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, आता महापौर कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

परभणीत उबाठा गटात जोरदार पक्षप्रवेश

परभणी जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात दोन तगड्या उमेदवारांचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांचे पक्षांतर वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

जांब जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेले राज्यस्तरावर काम करणारे प्राध्यापक किरण सोनटक्के तसेच पूर्णा तालुक्यातील वझूर गटासाठी इच्छुक असलेले मुंजाभाऊ कुक्कर यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. याशिवाय कातनेश्वर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष आणि ताडकळसचे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन अंभोरे हेही लवकरच उबाठा गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.

‘चूक असेल तर मी राजीनामा देतो’; जाधवांचे थेट आव्हान

यावेळी बोलताना खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांच्यावर थेट निशाणा साधला.“आम्ही कधी पैसे वाटून, मतदान याद्यांमध्ये घोळ करून किंवा बोगस मतदारांचा समावेश करून मतं घेतली नाहीत. माझी काही चूक असेल तर मी राजीनामा देतो, तुमची काही चूक असेल तर तुम्हीही राजीनामा द्यावा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

भाजपवर जोरदार टीका

खासदार जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवरही तीव्र शब्दांत टीका केली.“भाजपने निवडणुका अत्यंत अवघड करून ठेवल्या आहेत. आता पैशाशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत. कधी काळी सतरंज्या उचलणारे, पोलवर चढून झेंडे बांधणारे कार्यकर्ते निवडणूक लढायचे, पण आता तसं राहिलेलं नाही. भाजपने या निवडणुका केवळ पैशावाल्यांसाठीच ठेवल्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

“पैसे कुठून आणायचे आणि निवडणूक कुठून लढायची, असा प्रश्न आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे,” असेही जाधव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *