मतदानाच्या तारखेबाबत बदलाची मागणी
पुणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान जाहीर करण्यात आले असून, याच दिवशी कर्नाटकातील श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखेत बदल करण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे.
श्री मायाक्का देवीची वार्षिक यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून ग्रामीण भागातील लोकजीवनाशी घट्ट जोडलेली परंपरा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी मोठ्या संख्येने बैलगाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी तसेच पायी प्रवास करत देवीच्या दर्शनासाठी जातात. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागासाठी या यात्रेला अत्यंत महत्त्व आहे.
यंदा ५ फेब्रुवारी रोजीच यात्रेचा मुख्य दिवस आणि त्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान निश्चित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण मतदार यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. परिणामी लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही बाब लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मतदानाची तारीख बदलण्याची ठाम मागणी केली आहे. त्यांनी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेत यात्रेचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले. तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशीही दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रेचे स्वरूप, अपेक्षित भाविकांची संख्या आणि मतदानावर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
ग्रामीण मतदारांचा हक्क अबाधित राहावा, लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा उत्सव यांची टक्कर होऊ नये, अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर राज्य निवडणूक आयोग मतदानाच्या तारखेबाबत काय निर्णय घेतो, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.