मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही यावरुन काँग्रेसमध्ये मतमतांतरे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास नकार दिल्याचे दिसत आहे. विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडे कल आहे. राष्ट्रवादीचे शरद पवारही मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक दिसतात. अशा वेळी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला सोबत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक आहे. शिवसेना आणि मनसे एकत्रच असून त्यासाठी आम्हाला कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्षसोबत मुंबई वाचवण्यासाठी आमच्यासोबत आहेत. काँग्रेसचा निर्णय काहीही असो, मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवणार आहे. त्यासाठी इतर लहान पक्षांचाही पाठिंबा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत आघाडी केल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितले. त्यामुळे मनसेसोबत जाण्याचे संकेत वडेट्टीवारांनी दिले आहेत. शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावे, विचार जुळत नसले तरी भाजपविरोधात सगळ्यांनी एकत्र यावे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.