पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे. या व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुंबईत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमीन व्यवहारात एकही रुपया दिलेला नसल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, ‘मला या व्यवहाराची माहिती नव्हती. शेवटी आरोप करणे सोपे आहे. पण परिस्थिती काय आहे हे जनतेला कळलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की या व्यवहारामध्ये एकही रुपयाही दिला नाही. मोठ मोठे आकडे सांगितले गेले. विरोधकांनी आम्हाला टार्गेट करण्याचे काम केले. पण यात एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही. जो काही व्यवहार केला होता तो रद्द करण्यात आला आहे. राज्याचे अॅडिशनल चिफ सचिव, आयुक्त आणि इतर मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त नागपूर, मुद्रांक शुल्क विभाग यांच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करून एक महिन्याच्या आता हा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाले नाही. ते नागपूरला आहे. त्यावेळी फोनवर संवाद साधला. मी त्यांना सांगितला, माझ्या घरातील जवळचा माणूस असला तरी नियमाप्रमाणे चौकशी करा, समिती स्थापन करायची असेल तर करावी. मला त्या गोष्टीला पाठिंबा राहिल. माझ्या ३५ वर्षांच्या काळामध्ये नियम सोडून कधी काम केलं नाही. माझ्यावर जल सिंचन प्रकरणात आरोप झाले. त्याच श्वेतपत्रिकाही काढली होती. पण हाती काही आलं नाही. या प्रकरणाची अजिबात मला माहिती नव्हती. जर मला माहित असतं तर मी लगेच सांगितले असते. कुठलाही व्यवहार केला, तर मी सांगत असतो, सगळी माहिती घेऊनच व्यवहार करा. नियमाने व्यवहार करा. नियमाप्रमाणे चौकशी करा, असं काम मला चालत नाही. आज माझ्या प्रत्येक ऑफिसच्या अधिकाऱ्यांना त्यांनाही विचारलं, कुणाला फोन करून दबाव आणला का, अशी विचारणा केली. पण कुणीही असा दबाव आणला नाही, असेही अजित पवार म्हणाले.
ही सरकारी जमीन आहे, त्याचा व्यवहारच होऊ शकत नाही, ही पूर्वीचे महार वतनाची जमीन आहे. रेवेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग त्याचं झालं कसं? कोणी केलं कोण जबाबदार आहे याचा तपास होईल. तीन लोकांची एफआयआरमध्ये नावं टाकले आहेत. रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, जे ऑफिसमध्ये आले होते, ज्यांनी सह्या घेतल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन घेतली आहे, म्हणून पार्थ पवार याचे नाव नाही. याशिवाय या जमिनीचा 2005 किंवा 06 मध्ये याचा व्यवहार काही लोकांनी केला होता, पार्थ आणि त्याचा सहकारी दिग्विजय पाटील यांना कोणतीही माहिती नव्हती, असं त्यांच्या बोलण्यात आले आहे. महिनाभरात हे सगळं पुढे येईल आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना कळेल, असेही अजित पवार म्हणाले.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…