जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…

parth-ajit-pawar
Share

पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित एका कंपनीने कोरेगाव पार्कमधील 1804 कोटींची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. शिवाय ही जमीन खरेदी करताना २१ कोटींहून अधिक रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाशी आपला दुरान्वये कसलाही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुलाच्या डोक्यावरचा हात काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार म्हणाले, ‘तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचे माझ्या कानावर आले होते. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असे सांगितले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे.’

“मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी. त्यांचा तो अधिकार आहे. जर उद्या कोणत्याही बाबतीत कोणी तक्रार केली तर चौकशी करुन त्याची शहानिशा करणं, सत्यता पडताळणं आणि काय नक्की घडलं आहे हे पाहणं हे सरकारचं कामच आहे. मी दिवसभर येथे असल्याने त्याची माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन उद्या संध्याकाळी भेटेन. काय झालं, कसं झालं. कागदपत्रं कायदेशीर आहेत का? नियमात बसतात का? सगळ्यांची माहिती घेईन वस्तुस्थिती समोर मांडेन. मी कानावर आल्यानंतर चुकीच्या गोष्टी करु नका सांगितलं होतं. पण स्टॅम्प ड्युटी आणि इतर गोष्टींची शहानिशा करतो. अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कोणत्याही व्यवहारात, टॅक्सच्या, सगळ्याच्या बाबतीत नियमानेच वागलं पाहिजे. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणेच झालंच पाहिजे. कोणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये याच मताचा मी आहे,” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या 1 लाखाचं भाग भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये किंमत असलेली जमीन, अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही जमीन खरेदी करताना 21 कोटींच्या मुद्रांक शुल्काची माफीही मिळाली. मुळात जी जमीन अमेडियाने खरेदी केली, ती महार वतनाची असल्याचे समोर आले आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच या जमीन व्यवहारप्रकरणात नियमांची मोडतोड आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.

अजित पवार संतापले रुपाली चाकणकर यांच्यावर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *