नाशिक: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घरात बसून पीक पाहणी केली होती. आताही त्यांनी घरात बसून पाहणी करावी, असा टोला भाजपचे मंत्री गिरीश महाजन लगावला. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या एका समर्थक असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपच्या आमदाराची सुपारी दिल्याचा मोठा दावा दानवे यांनी केला आहे. राज्यात आधीच गँगवॉरच्या घटना घडत आहेत. अशात अंबादास दानवे यांनी थेट भाजप आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्याकडे सुपारी दिल्याचे काही पुरावे असतील, तर त्यांनी द्यावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. तसेच कुणाची अशी तक्रार देखील आली नाही. त्यामुळे दानवे यांचे विधान म्हणजे हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. या संदर्भात अंबादास दानवे यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे म्हणाले, ‘गिरीश महाजनांची औकात आहे का? उद्धव ठाकरेंवर टीका करायची. गिरीश महाजनांना सपोर्ट करणाऱ्या एका माजी नगरसेवकानं नाशिकमधील भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली आहे. गिरीश महाजनांचं समर्थन करणारा नाशिकचा माजी नगरसेवक आणि भाजपचा आमदार, या दोघांची नावं मला माहीत आहेत. पण ती नावं मी सांगणार नाही, तुम्ही शोधा. याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी आधी याचा तपास करावा, हा नगरसेवक कोण आहे? त्याने का सुपारी दिली, त्यावर कारवाई करावी, यानंतर आमच्यावर टीका करावी.’