स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जयंतराव पाटील ऍक्शन मोडमध्ये…

jayant-patil
Share

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी आज उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मागील काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्य करून जयंतराव पाटील यांना घेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू होते मात्र या विषयांकडे दुर्लक्ष करत आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे जयंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले आहे.

ही आहे जयंतराव पाटील यांची राजकीय खेळी…
आनंदराव मलगुंडे हे जयंतराव पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आरक्षणात नगराध्यक्षपदाची जागा ही ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंतराव पाटील यांनी आनंदराव मलगुंडे यांना ही उमेदवारी दिली आहे. आनंदराव मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य व्यक्तीमत्व आहेत. शिवाय मलगुंडे यांनी याधीही नगराध्यक्ष पदाचे सूत्र सांभाळले असल्याने एका अनुभवी व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे देखील अधोरेखित होते‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *