बीड : निवडणुकीच्या काळात चपटी द्यावी लागते, कोंबडं-बकरं द्यावं लागतं. तसेच नुसता निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही, तुमच्याकडे किती ‘दारू’गोळा आहे याची माहिती द्या, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्यांनी केले आहे. प्रकाश सोळंके यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांचे वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये प्रकाश सोळंके यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, “माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं मतदान घेतलं हे त्यांना चांगलं माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं आणि कुणासाठी बकरं कापावं लागतं. कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण यात तुम्ही एक्सपर्ट बनलेले आहात.”
माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत. आपण घेतलेला अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे असं आमदार प्रकाश सोळंके म्हणाले. निवडणूक लढवण्यासाठी नुसतं इच्छुक असून उपयोग नाही तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र कुठेही कमी पडता कामा नये. समोरचा माणूस निवडणुकीत जर 100 रुपये खर्च करणार असेल तर आपलीही 100 रुपये खर्च करण्याची तयारी असावी. आजपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला आहात. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागेल, चारपटीने कष्ट घ्यावे लागतील, असेही प्रकाश सोळंके म्हणाले.