पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

Share

पुणे: गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. अनंत चतुर्दशीला शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून, पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.

मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात सुमारे १० हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये चार अपर पोलीस आयुक्त, १४ पोलीस उपायुक्त, ३५ सहायक पोलीस आयुक्त, १५४ पोलीस निरीक्षक, ६७५ पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे सात हजार पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय एसआरपीएफच्या दोन कंपन्या, ९०० होमगार्ड, १२ क्यूआरटी आणि २१ राईट कंट्रोल पथके तैनात करण्यात आली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे राहणार असून, नियंत्रण कक्षातून विशेष पथकांकडून निरीक्षण केले जाणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार व्यक्ती, अनुचित प्रकार घडविणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची नजर राहणार आहे. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून, रुग्णवाहिका व अग्निशामक वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आले आहेत. विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

यंदा ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या संख्येवर बंधन नसले, तरी एका चौकात पथकाला १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबता येणार नाही. प्रत्येक मंडळाने दोनपेक्षा अधिक पथके ठेवू नयेत, याबाबत मंडळांशी चर्चा करण्यात आली आहे. टोल, प्रेशर हॉर्न, लेझर लाईट आणि प्लाझ्मावर बंदी असून, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनिपातळी तपासण्यासाठी ११२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मानाचा पहिला कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींच्या मिरवणुकीसाठी आकर्षक रथांची सजावट करण्यात आली आहे. कसबा गणपतीचा ‘हरित रथ’, तुळशीबागचा ३२ फूट उंच विष्णूरथ, अखिल मंडईचा कोणार्क सूर्य मंदिर रथ आणि दगडूशेठचा ‘श्री वक्रतुंड’ रथ मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. मिरवणुकीत विविध ढोल-ताशा, नगारावादन, सनई-चौघडा, ब्रास बँड तसेच केरळच्या चेंडा मेलम पथकांचा सहभाग राहणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीत ‘अमली पदार्थमुक्त भारत’ जनजागृती करणारा मानवसेवा रथही सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!