रियाधः अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने आपली महत्त्वपूर्ण पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. हूती विद्रोह्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने हे पाऊल उचलले आहे. मात्र त्यामुळे जगभरातील तेल पुरवठ्याबाबतची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल १०४ डॉलर्सवर गेली आहे. शुक्रवारी तेलाची किंमत १०८ डॉलरपर्यंत पोचली होती. नंतर त्यात किंचित घट झाली. सध्या किमती अशा पातळीवर आहेत, की ज्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांच्या समस्या वाढू शकतात.
वाढता तणाव आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने ही ठाम भूमिका घेतली आहे. सुमारे १,२०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन सौदी अरेबियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पाइपलाईनमुळे त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून न राहता देशाच्या इतर भागांमध्ये तेलाची वाहतूक करणे शक्य होते. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी टँकर वाहतूक आधीच लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. आता तांबड्या समुद्रातील मार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुरवठ्याच्या आणखी एका मार्गावर गंभीर परिणाम झाला आहे.
अत्यावश्यक तेल पाइपलाइन बंद झाल्यानंतर, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की खबरदारीचा उपाय म्हणून ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत या पाइपलाइनमधून दररोज ४० ते ५० लाख बॅरल तेलाची वाहतूक होत होती, जे जागतिक तेल पुरवठ्याच्या अंदाजे ४% ते ५% होते. त्यामुळे, पाइपलाइन बंद झाल्यामुळे आधीच ताणल्या गेलेल्या जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर आणखी परिणाम होऊ शकतो.
सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले, की गुरुवारी सकाळी रियाध आणि मदिना परिसरात येमेनमधील हूती बंडखोरांकडून पाइपलाइनला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात काही लोक जखमी झाले असून, पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. मात्र निर्यातीवर नेमका काय परिणाम झाला आहे हे अद्याप स्पष्ट नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये मदीना शहराच्या दक्षिणेकडील पाइपलाइनमधून काळ्या धुराचे लोट निघताना दिसत होता.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील टँकर वाहतुकीत झालेली घट, तांबडा समुद्र आणि बाब अल-मंदाबमधील वाढता धोका, आणि आता सौदी अरेबियाची मुख्य पुरवठा पाइपलाइन बंद झाल्यामुळे तेल पुरवठ्याबद्दल चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे, की तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त राहिल्यास अनेक अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.