रियाधः अमेरिका आणि इराण आपला संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच, येमेनच्या इराण-समर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरेबियामधील महत्त्वाच्या लष्करी आणि तेल केंद्रांवर हल्ला केल्याने, मध्य-पूर्वेत युद्धाला पुन्हा नव्याने तोंड फुटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २०२२ मध्ये झालेल्या शांतता करारामुळे, आठ वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला होता. हूती आणि येमेन सौदी-समर्थित आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार यांच्यातील संघर्षाची नवीनतम युद्धाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, सौदी अरेबियावरील हल्ल्यांमुळे पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांचा सुरक्षा गट असलेला कथित ‘इस्लामी नाटो’ कार्यान्वित होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अशी शक्यता प्रकट केली आहे.
इराणहून येणाऱ्या एका विमानाचा उतरण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, सरकारी सैन्याने हूतींच्या ताब्यातील येमेनची राजधानी सना विमानतळावर हल्ला केला. त्यामुळे संघर्षाची ताजी फेरी सुरू झाली. त्यानंतर लगेचच, हूतींनी सौदी अरेबियावर सागरी निर्बंध जाहीर केले आणि ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या साह्याने तांबड्या समुद्रातील सौदी तेल सुविधा, विमानतळे आणि तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू झाले.
गेल्या आठवड्यात हूतींनी तैझ आणि होदेदा शहरांमधून मोचा या बंदर असलेल्या शहराच्या आणि तांबड्या समुद्रातील बाब अल-मंदेब सामुद्रधुनीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मोठा हल्ला चढवल्याने संघर्ष आणखी वाढला.
अनादोलू वृत्तसंस्थेनुसार, बुधवारी येमेनच्या तैझ, अल-बायदा, अल-धले आणि अल-हुदायदाह प्रांतांमध्ये येमेनी सरकारी सैन्य आणि हूती यांच्यात सुरू झालेल्या लढाईत, अनेक लोकांचा मृत्यू झाला. हूती बंडखोरांच्या हल्ल्यांपासून मोखा या बंदर असलेल्या शहराचे संरक्षण करण्यासाठी बाब अल-मंदाब सामुद्रधुनीजवळ अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. लढाई वाढल्यामुळे येमेन पुन्हा एकदा व्यापक संघर्षाच्या दिशेने ढकलला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोमवारी सौदी अरेबियाने सांगितले की, नैऋत्येकडील आभा, खमिस मुशायत, जिझान आणि नजरान या शहरांमधील लष्करी तळ, तेल सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांवर झालेल्या हूतींच्या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह ७३ नागरिक जखमी झाले आहेत. रियाधने प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे.
येमेनच्या सरकारी दलांसाठी शस्त्रे आणि दारुगोळा वाहून नेणाऱ्या अनेक ट्रकवर हल्ला केल्याचा दावा हूतींनी केला आहे. याउलट, येमेनमधील एका तुरुंगावर हल्ला करून २३ जण ठार केल्याचा आरोपही हूतींनी सौदी अरेबियावर केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पुन्हा सुरू झालेल्या संघर्षात किमान १९४ लोकांचा मृत्यू झाला आणि ८८० हून अधिक जण जखमी झाले. या युद्धात आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
सप्टेंबर २०१४ मध्ये हूती सैन्याने राजधानी सनावर ताबा मिळवला, त्यामुळे एका विनाशकारी गृहयुद्धाला सुरुवात झाली. रियाधमध्ये, हूतींचा उदय सौदी अरेबियासाठी एक सुरक्षा धोका म्हणून पाहिला जात होता. २०१५ मध्ये, रियाधने संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, इजिप्त आणि इतर देशांची आघाडी तयार केली आणि येमेनच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी लष्करी हस्तक्षेप केला. हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
जर युद्ध आणखी वाढले, तर त्यामुळे तांबड्या समुद्रातील व्यापारी जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सततच्या हल्ल्यांमुळे ऊर्जा प्रवाहासाठी तांबडा समुद्र अधिक महत्त्वाचा बनला आहे.