मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात CNGच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने (MGL) घेतला आहे. या दरवाढीनंतर सीएनजीचा नवा दर ९१.५० रुपये प्रतिकिलो होणार आहे. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२६ च्या सकाळपासून नवीन दर लागू होणार आहे.
मध्यपूर्वेतील सुरू असलेले संकट, देशांतर्गत गॅसच्या पुरवठ्यात झालेली घट आणि महागड्या आयात केलेल्या आरएलएनजीवरील वाढलेले अवलंबित्व यामुळे गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. विशेषतः सीएनजीची मागणी वाढल्याने आणि आयात केलेल्या गॅसचा वापर वाढल्याने कंपनीवरील खर्चाचा भार वाढला आहे.
वाढत्या खर्चाचा काही भाग भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना सीएनजीचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. मुंबईव्यतिरिक्त इतर भौगोलिक क्षेत्रांतील सुधारित दरांसाठी ग्राहकांनी एमजीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या दरवाढीचा परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांच्या खिशावर होणार आहे.
महागाईचा भडका! LPG नंतर CNG च्या दरात वाढ…