वॉशिंग्टनः गेल्या आठ महिन्यांपासून चालू असलेला संघर्ष संपवण्यासाठी तेहरानसोबतच्या वाटाघाटींमध्ये प्रगती होत असल्याचे संकेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. मात्र त्याचवेळी अमेरिकेने इराणच्या केशम बेटावर हल्ला केला.
एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगणाच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्वांत मोठे बेट असलेल्या केशमवरील हल्ल्याचे वर्णन, वॉशिंग्टनने अलिकडच्या काही दिवसांत इराणविरुद्ध गुप्तपणे केलेल्या मर्यादित हल्ल्यांच्या मालिकेतील नवीनतम हल्ला असल्याचे म्हटले आहे.
इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, बेटावर एकापाठोपाठ पाच स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि काही रहिवाशांनी आकाशात दोन विमाने उडताना पाहिल्याचे सांगितले.
पेंटागॉनने कथित हल्ल्यांसंदर्भातील प्रश्न यूएस सेंट्रल कमांडकडे सोपवले. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा एएफपीच्या प्रतिक्रियेच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद दिला नाही. अमेरिका गेल्या काही आठवड्यांपासून इराणवर लहान-मोठे हल्ले करत आहे.
काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांचे स्वरूप बचावात्मक असल्याचे म्हटले आहे, जेणेकरून इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ला करण्याचे स्वातंत्र्य मिळू नये. ही सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी एक प्रमुख मार्ग असून, फेब्रुवारीच्या अखेरीस युद्ध सुरू झाल्यापासून ती मोठ्या प्रमाणात रोखण्यात आली आहे.
मोठ्या लढाऊ कारवाया पुन्हा सुरू करण्याचा कोणताही इरादा दर्शवू नये, म्हणून अमेरिकेने या हल्ल्यांची जाहीर घोषणा केलेली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. तेहरानसोबत करार होऊ शकतो, असा दावा मध्यावधी निवडणुकांच्या पूर्वसंध्येला डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीच्या ऊर्जा मार्गावर घातलेल्या नाकेबंदीमुळे गगनाला भिडलेल्या तेलाच्या किंमती, संघर्ष संपण्याची शक्यता असल्याच्या आशेमुळे सोमवारी सात टक्क्यांहून अधिक घसरल्या.