नवी दिल्ली: पाचव्या पिढीतील एफ-३५ या लढाऊ स्टेल्थ विमानाच्या खरेदीचा प्रस्ताव अमेरिकेने भारताला दिला आहे, परंतु अमेरिकी अधिकारी भारतीय हवाई दल अधिकाऱ्यांना या विमानाच्या जवळही येऊ देत नाहीत, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी एका वरिष्ठ अमेरिकी हवाई दल अधिकाऱ्याच्या उपस्थितीत बोलताना सांगितले.
जोधपूर येथे ‘तरंग शक्ती-२०२६’ या बहुराष्ट्रीय हवाई सरावाच्या समारोप सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत, अमेरिकेच्या पॅसिफिक हवाई दलाचे कमांडर जनरल केविन श्नाइडर यांच्यासोबत व्यासपीठावर असताना भारतीय हवाई दल प्रमुखांनी ही टिप्पणी केली.
अमेरिकेने भारताला एफ-३५ लढाऊ विमाने विकण्याचा अधिकृत प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता, एअर चीफ मार्शल सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की तुमचे अधिकारी आम्हाला विमानाजवळही जाऊ देत नाहीत आणि तुम्ही ते आम्हाला विकण्याबद्दल बोलत आहात.
जनरल श्नाइडर म्हणाले की, एफ-३५ ची माहिती देण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. कार्यक्रम स्तरावर सुरक्षा वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वे आहेत, जी ठरवतात की आपण काय सामायिक करू शकतो, केव्हा सामायिक करावे, तसेच त्याचे संरक्षण कसे करावे, असे ते म्हणाले.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले, की रशियाने एसयू-५७ या पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने भारताला विकण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, अद्याप त्यांच्या खरेदीबाबत अद्याप विचार झालेला नाही. भारत पाचव्या पिढीच्या अंतरिम पर्यायाचा विचार करत आहे, तर त्याचे स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमान अॅम्का सेवेत दाखल होण्यास अजून अनेक वर्षे लागू शकतात, असेही ते म्हणाले.
चीन जे-२० आणि जे-३५ सह आपल्या स्टेल्थ विमानांच्या ताफ्याचा विस्तार करत असतानाच हा शोध सुरू झाला आहे. चीनने पाकिस्तानला ४० जे-३५ विमानांचा पुरवठा करण्याची शक्यता आहे, मात्र त्यांचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही.
भारताकडून होणाऱ्या कोणत्याही खरेदीमध्ये केवळ लढाऊ जेटच नव्हे, तर विमानाची संपूर्ण तंत्रज्ञान उपलब्धता, एकीकरण, शस्त्रे, देखभाल आणि दीर्घकालीन सामरिक अवलंबित्व यांसारख्या बाबींचाही समावेश असेल, असे हवाई दल प्रमुखांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाला काय खास बनवते
पाचव्या पिढीची लढाऊ विमाने खास आहेत कारण ती रडारवर सहजासहजी दिसत नाहीत आणि मात्र ही लढाऊ विमाने त्यांच्या सभोवतालचे सर्व काही पाहण्याइतकी बुद्धिमान असतात. त्यांचा आकार, विशेष आवरण आणि विमानात लपवलेली शस्त्रे यांमुळे शत्रू त्यांच्या रडारवर त्यांना शोधू शकत नाहीत. त्यालाच स्टेल्थ म्हणतात.