मुंबई: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून माघारी परतला आहे. गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागांतूनही मान्सून माघारी परतला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत आणखी माघार अपेक्षित आहे. पूर्व भारतातील आणखी काही भाग आणि उत्तर द्वीपकल्पातून मान्सून माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. ईशान्य भारतातील अनेक भागांतूनही पुढील काही दिवसांत मान्सून माघारी जाण्याची शक्यता आहे.
पुढील ३ ते ४ दिवसांत पूर्व भारत आणि उत्तर द्वीपकल्पाच्या आणखी काही भागांतून, तसेच ईशान्य भारताच्या अनेक भागांतून नैऋत्य मान्सून पूर्णपणे माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
नैऋत्य मान्सूनचा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या काही भागांतून परतीचा प्रवास चालूच असून हवामान हळूहळू मान्सूनोत्तर ऋतूकडे सरकत आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी, अनेक भागांत पावसाची शक्यता कायम आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी, तर उत्तर भारतातील काही भागांत तुरळक पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारतातील काही भागांत पाऊस चालूच राहील. दिल्ली, पाटणा आणि लखनौमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात, तर तमिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून जाणार असून त्यानंतर सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता कुठेही दिसत नाही. हवामान कोरडं राहणार आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट वाऱ्यांमुळे हवामान बिघडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस होईल मात्र त्यामुळे आणखी उष्णता वाढण्याची भीती आहे. दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात होत आहे. अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची भीती आहे.
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात अगदी तुरळक पावसाचा अंदाज आहे. मान्सूच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून तिथून वारे खाली सरकत आहेत. दक्षिण भारतात पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या तापमान वाढण्याचे संकते आहेत.