नांदेड: मराठवाड्यासह राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि करपणाऱ्या पिकांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यथा समजून घेण्यासाठी शनिवारी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, दुष्काळाचे भीषण वास्तव आणि शेतकरी संकटावर गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी बैठकीला उपस्थित असलेले नेते आणि वरिष्ठ अधिकारी काजू-बदामाचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याचे उघडकीस आले आहे.
लोकप्रतिनिधिनी काजू बदामवर ताव मारताना पाहून, राज्यातून टीकेची झोड उठली. सोशल मीडियाच्या या जमान्यात टीकेचे बाण सुटले आणि मग मंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधींना सारवासारव करावी लागली. ती करतानाचा त्यांचा केविलवाणा प्रयत्नही समोर आला. खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवरच अरेरावी केली. अशा बैठकांमध्ये संवेदनशीलता जपणे आवश्यक असताना झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी, खेद व्यक्त करण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार जाधव पत्रकारांवरच संतापल्याचे दिसले.
View this post on Instagram
या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याघटनेनंतर आता दुष्काळाची पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांनी बशीतून काजू बदाम दिले, त्यानंतर आपली निवेदने दिली. यावेळी हिंगोलीमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या असं म्हणत शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रश्न केले.
त्यावर उत्तर देताना दत्तात्रय भरणे म्हणाले, की पाहणी करण्यासाठी आपल्या विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक आमदार, खासदारांनी आपली अनेक मते मांडली, सर्वांनी शेतकरी कसा अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था काय आहे, याविषयी त्यांनी माहिती दिली, त्याबाबतचा सर्व आढावा घेतला आहे.
या विभागातील सर्व शेतकऱ्यांचे शेवटी पीक गेले आहे, पीक जळलेले आहे, पीक हातातून गेले आहे, या पिकावर शेतकरी बांधवांनी अनेक स्वप्न रंगवली होती, ती स्वप्न आता भंग पावलेली आहेत. अशा अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये जेवढी म्हणून शेतकऱ्याला जास्त मदत करता येईल, त्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. हे संकट मानवनिर्मित नाही. निसर्गापुढे काही चालत नाही. या संकटाचा सामना आपल्या सर्वांना करावा लागेल. राज्य सरकारतर्फे जी काही मदत करता येईल आणि ज्या योजना मधून शेतकऱ्यांना मदत करता येईल, ती मदत त्यांनी निश्चित प्रकारे करण्यात येईल. आम्ही या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, याची भरणे यांनी ग्वाही दिली.
या काळात पिण्याचे पाणी किंवा चारा टंचाई असो, भविष्यात कशाचीही कमतरता प़डणार नाही. याबाबतीत कलेक्टरांना नियोजन करायला सांगितला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवल्या जातील, असेही भरणे यांनी सांगितले.