इराण रिव्होल्युशनरी गार्डच्य महिला विभागाचा अमेरिका आणि इस्राईलविरुध्दच्या निदर्शनात बंदुकांसह सहभाग

Share

कैरोः अनेक महिन्यांच्या युद्धानंतर शुक्रवारी, सरकारने आयोजित केलेल्या प्रतिकार निदर्शनात लाखो इराणी नागरिक एकत्र आले आणि शस्त्र उचलण्याची तयारी दर्शवली. या निदर्शनात बंदुकधारी महिलांचाही सहभाग मोठा होता फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतरचे हे सर्वात मोठे प्रदर्शन होते.

अमेरिकेने इराणच्या बंदरांवर लादलेल्या नौदल नाकेबंदीमुळे आणि तेहरानचे आर्थिक नुकसान वाढविण्याच्या उद्देशाने लादलेल्या नव्या निर्बंधांमुळे, अर्थव्यवस्था अधिकच खालावली आहे. इराण सरकारने लोकांना एकत्र आणण्याचा आणि राष्ट्रीय एकतेवर जोर देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘जनफदा-ए इराण,’ म्हणजेच इराणसाठी प्राणांचे बलिदान देणारे, असे वर्णन असलेल्या या मोहिमेअंतर्गत, मर्यादित लष्करी प्रशिक्षण घेऊन देशाचे रक्षण करण्यासाठी स्वयंसेवा करणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. ते लढाऊ गणवेशात, हातात ध्वज घेऊन तेहरानच्या मध्यवर्ती भागातून संचलन करत होते आणि उपस्थित लोक जल्लोष करत होते.

गेल्या काही दिवसांपासून, सरकारी प्रसारमाध्यमे इराणी नागरिकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत आणि लवकरच असॉल्ट रायफल्सचे प्रशिक्षण सुरू होईल असे सांगत आहेत. हे स्वयंसेवक शक्तिशाली रिव्होल्यूशनरी गार्ड या निमलष्करी दलासाठी आणि त्याच्या पूर्णपणे स्वयंसेवकांनी बनलेल्या बासिज या शाखेसाठी सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर म्हणून काम करतील.

तेहरानच्या गार्डचे प्रमुख, जनरल हसन हसनझादेह यांनी सरकारी प्रसार वाहिनीला सांगितले की, सहभागी होण्यासाठी ६ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली असून, या प्रशिक्षणात १० लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारी सकाळी, प्रसारक वाहिनीने ३ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरल्याचा अंदाज वर्तवला होता.

बसिजचे नवीन प्रमुख, हुसेन तायब यांनी रॅली सुरू होताना आपल्या भाषणात घोषित केले की, स्वयंसेवक पूर्ण ताकदीने संरक्षणासाठी तयार असतील आणि लवकरच इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या रॅली काढल्या जातील.

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, लष्करी कमांडर आणि इतर वरिष्ठ अधिकारी हा संचलन पाहत असताना, ताएब पुढे म्हणाले की, नवीन प्रशिक्षणार्थी इराणच्या शत्रूंसाठी एक दुःस्वप्न निर्माण करतील. काही सहभागींनी अमेरिका आणि इस्रायलचे ध्वज तुडवले. इतरांनी अमेरिकेचा नाश होवो आणि इस्रायलचा नाश होवो, अशा घोषणा दिल्या.

ही निदर्शने इराणसाठी लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याची एक संधीही होती. विमानविरोधी तोफखाना दले निदर्शनात सहभागी होत्या, तर काळ्या रंगाचे हिजाब घातलेल्या महिला गार्ड सदस्या ट्रकवर बसवलेल्या मशीनगन घेऊन बसल्या होत्या.

गार्डने असे ड्रोन प्रदर्शित केले, ज्यांचा वापर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर केला जातो. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले असून, त्यामुळे आखाती प्रदेशातून उर्वरित जगाला होणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे ९ कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये ३ कोटींहून अधिक लोकांनी एका ऑनलाइन फॉर्मद्वारे किंवा सार्वजनिक सभांमध्ये धर्मसत्तेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!