तेल अवीवः दक्षिण लेबनॉनमधील मोक्याच्या अली अल-ताहेर पर्वतरांगेखाली इराण-समर्थित हिजबुल्लाहने खणलेले महत्त्वाचे बोगदे उद्ध्वस्त केले करून, इस्राएलने या भागावरील आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. बोगद्यांचे जाळे उद्ध्वस्त केल्यानंतर लेबनॉनमध्ये प्रचंड मोठ्या स्फोटांची नोंद झाली, तर अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने ४.१ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद केली आहे.
बोगद्यांचे जाळे उभारून त्यात दारूगोळा साठविण्याबरोबरच, बाँबहल्ल्यांपासून सुरक्षित निवारा मिळविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यासाठी इराणकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येतो. गेल्या दोन दशकांपासून इस्राईलविरुद्ध लढण्यासाठी हिजबुल्लाहने ही तयारी केली होती, असे इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री इस्राएल काट्झ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
इस्राएली सैनिकांनी सांगितले, की हिजबुल्लाहची सुरुंगातील पायाभूत सुविधा दोन किलोमीटरपेक्षा जास्त पसरली होती आणि त्यात इराणी बनावटीचे डझनभर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि मानवरहित ड्रोन्स, मशीन गन, डझनभर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि शेकडो सुरुंग व स्फोटक उपकरणे होती. या भूमिगत संकुलात हिजबुल्लाहच्या ‘बद्र’ युनिटचे कमांड सेंटरदेखील होते.
एका लष्करी अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, डोंगररांगेच्या परिसरात कार्यरत असलेल्या काही दहशतवाद्यांनी तो परिसर सोडून दिला होता, तर इतरांना हवाई हल्ले आणि तोफखान्याच्या माऱ्याने ठार मारण्यात आले. गेल्या मार्चमध्ये इराणसमर्थक हिजबुल्लाहने लेबनॉनला मध्यपूर्वेतील युद्धात ओढले. जूनमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर आणि त्यानंतर लेबनॉन व इस्राएल यांच्यात झालेल्या करारानंतर हिंसाचारात काही काळ शांतता होती. तथापि, गेल्या काही दिवसांत लढाईची तीव्रता वाढली आहे.
लेबनॉन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मार्चपासून इस्राएली हल्ल्यांमध्ये एकूण ४,३०० हून अधिक लोक मारले गेले आणि इस्राएली सैन्याकडे दक्षिणेकडील क्षेत्र ताब्यात आहे.