वॉशिंग्टनः व्हिसा, ग्रीन कार्ड किंवा इतर स्थलांतर विषयक लाभांची वाट पाहणाऱ्या स्थलांतरितांना दिला जाणारा वेळ, कमीत कमी करण्याचे आवाहन अमेरिकेतील स्थलांतरण न्यायाधीशांना केले जात आहे. या निर्णयामुळे काही लोकांना त्यांच्या अर्जांवर निर्णय होण्यापूर्वीच हद्दपारीला सामोरे जावे लागू शकते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप प्रशासनातर्फे हद्दपारीची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि अमेरिकेच्या स्थलांतर न्यायालय प्रणालीतील प्रलंबित प्रकरणांचा प्रचंड साठा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना, इमिग्रेशन न्यायाधीशांसाठीच्या अनिवार्य प्रशिक्षणातून हे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
‘द गार्डियन’च्या एका अहवालानुसार, प्रशिक्षणातील सामग्रीचे पुनरावलोकन करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे, की न्यायाधीशांना ‘कंटिन्युअन्स’ (खटला पुढे ढकलणे) मर्यादित करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. ज्यामुळे स्थलांतरितांना वकील शोधण्यासाठी, त्यांच्या प्रकरणांची तयारी करण्यासाठी किंवा इतर इमिग्रेशन एजन्सींच्या निर्णयांची वाट पाहण्यासाठी वेळ मिळू शकतो.
स्थलांतरण न्यायालयांमधून प्रकरणे अधिक जलदगतीने पुढे नेण्याच्या उद्देशाने हे प्रयत्न केले जात आहेत. खटले पुढे ढकलण्याचे प्रमाण मर्यादित करणे आणि प्रकरणे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अहवालानुसार, स्थलांतरण न्यायलयीन प्रणालीमध्ये अंदाजे ३२ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत.