मुंबई: अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी सर्टिफिकेट आहे, असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी आता त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. सुप्रिया सुळे यांचा उल्लेख आपल्याकडून अनवधानाने झाला, असे वडेट्टीवार म्हणाले. यावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. तथापि, ओबीसी सर्टिफिकेट घेऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत आपली भूमिका बदललेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. त्याचसोबत सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलं आहे, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. शरद पवार यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे की नाही याची आपल्याला माहिती नाही, असेही ते म्हणाले होते.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरद पवार) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवारांनी माफी मागावी, अशी मागणी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनीही वडेट्टीवारांच्या दाव्याला जोरदार विरोध केला. दिशाभूल करणाऱ्या दाव्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे. आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाही. वडेट्टीवारांनी माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याचा पुरावा द्यावा, अन्यथा जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते नेहमीच आपल्याला टार्गेट करत असतात. आमचे आठ खासदार त्यांच्यासोबत असून गेल्या १२ वर्षांपासून आम्ही काँग्रेससोबत आहोत. उलट काँग्रेसवर कुणी टीका केली, तर त्याला आपण प्रत्युत्तर देतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यापूर्वी मराठा नेत्यांवर आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले होते, की ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत आपली भूमिका तसूभरही बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा. ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या अशा भूमिकेचे आपण कधीही समर्थन करणार नाही. आपला संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे.