शोक संपायच्या आधीच सत्तेची शपथ!सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा संतप्त सवाल

Share

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले. यानंतर थोड्याच वेळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सत्ता आणि स्वार्थ हेच आता एकमेव सत्य उरले आहे,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दमानिया म्हणाल्या, “मी स्वतः अजित पवारांविरोधात १५ वर्षे लढा दिला. तरीही त्यांच्या अपघाताची घटना अत्यंत अस्वस्थ करणारी होती. संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता. कालच अस्थी विसर्जन झाले आणि लगेच रात्री सगळी मंडळी मुंबईला परतली—आज शपथविधीसाठी. ही घाई कुठेतरी खटकली.”

“सत्तेपुढे ना भावना उरल्या आहेत, ना आपलेपणा. इतकी वर्षे ज्या व्यक्तीसोबत काम केले, त्यांना अवघ्या तीन दिवसांत बाजूला सारून पुन्हा सत्तेकडे वाटचाल कशी?” असा सवालही त्यांनी केला.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असत्या तर ‘पहिली महिला उपमुख्यमंत्री’ म्हणून सर्वांनाच आनंद झाला असता; मात्र थोडा अवकाश घेऊन निर्णय झाला असता तर अधिक योग्य ठरले असते, असे दमानिया म्हणाल्या.

यासोबतच त्यांनी भाजपावर गंभीर आरोप करत “हा सत्तासंघर्ष असून राष्ट्रवादी व शिंदे गट संपवण्याचा प्रयत्न आहे,” असा दावा केला. “सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावणे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा विचार, वित्तमंत्री पद स्वतःकडे ठेवणे—हे सर्व भाजपाचा मोठा ‘गेम’ असल्याचे स्पष्ट दिसते,” असेही दमानिया यांनी नमूद केले.

या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली असून, शोक आणि सत्तांतराच्या वेळेवरून तीव्र राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *