नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता स्थापन होणार असून महापौरही काँग्रेसचाच होईल, असा ठाम दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. भाजपकडून काँग्रेसचे नगरसेवक संपर्कात असल्याचे जे दावे केले जात आहेत, ते निव्वळ “हवेतली पतंगबाजी” असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात सत्ता स्थापन करणे आणि काँग्रेसचा महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता असल्याचे सांगत, आवश्यक संख्याबळ आधीच जमवल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात तोडफोड, नगरसेवक पळवणे यासाठी कोणताही स्कोप नसल्याचे सांगत, कोण कितीही दावे केले तरी महापौर काँग्रेसचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उलट भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा काँग्रेसचा महापौर शहराला मिळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले असून, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने त्यांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. महापौर पदावर शिवसेनेने दावा करणे हा त्यांचा अधिकार असून, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपुरात काँग्रेसचा निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक महापौर व्हावा, अशी भूमिका असल्याचे सांगत नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
याचवेळी त्यांनी भाजपवर आणखी टीका करताना सांगितले की, मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांबाबत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजराती भाषेत काढलेली अधिसूचना ही धोक्याची सुरुवात आहे. पालघरपासून गुजरातीचा शिरकाव सुरू असून, भाजपचा मुंबईत महापौर झाला तर मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार, हे स्पष्ट असल्याची टीकाही त्यांनी केली.
तसेच, स्वित्झर्लंडच्या दावोस येथे राज्य सरकारकडून हजारो कोटींचे सामंजस्य करार होत असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, देशातीलच कंपन्या परदेशात जाऊन करार करत असतील तर त्याचा महाराष्ट्राला नेमका काय फायदा, परदेशी गुंतवणूक प्रत्यक्षात राज्यात येणार का, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.