पाकिस्तान हा दहशतवादाचेच केंद्र; आमदार रणबीरसिंह पठानिया यांचे फारूख अब्दुल्लांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर

Share

उधमपूरः उधमपूर पूर्वचे आमदार रणबीर सिंह पठानिया यांनी, पाकिस्तानला जम्मू आणि काश्मीरचा संरक्षक संबोधणाऱ्या डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्या कथित वक्तव्यावर कठोर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस आणि राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

जम्मू आणि काश्मीरची सुरक्षा भारतीय संविधानाने, सुरक्षा दलांच्या बलिदानाने आणि लोकांच्या शौर्याने मजबूत होते, सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानमुळे नव्हे, असे सांगून पठानिया म्हणाले, की दहशतवाद आणि सीमापार संघर्षामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना दीर्घकाळापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राजकीय नेतृत्वाने अशा संवेदनशील विषयांवर जबाबदारीने बोलले पाहिजे. या प्रदेशाचे भविष्य शांतता, विकास, लोकशाही संस्था आणि उत्तरदायी शासनावर आधारित असले पाहिजे.

पठानिया यांनी नॅशनल कॉन्फरन्स सरकारवर निवडणुकीची आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचाही आरोप केला. बेरोजगारी, मूलभूत सुविधांचा अभाव, जनतेच्या तक्रारी आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

त्यांच्या मते, जनतेला राजकीय वक्तृत्वापेक्षा चांगले रस्ते, रोजगाराच्या संधी आणि पारदर्शक प्रशासनाची गरज आहे. सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन घोषणांवरून नव्हे, तर प्रत्यक्ष झालेल्या विकासावरून व्हायला हवे.

पठानिया यांनी उधमपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात पालनू ते गडाला कंडी रस्ता आणि खून ते सल्टान रस्ता या दोन रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले. ते म्हणाले, की ग्रामीण भागांना शिक्षण, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सुविधांशी जोडण्यात रस्त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

प्रदेशाच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. उधमपूर पूर्वमधील कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक सुविधा सुधारणे हे आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!