मुंबई: संघटना आणि महायुतीतील घटक पक्षाकडून मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी काल (ता. ३) झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमध्ये नेमके काय सुरू आहे, याची माहिती खालच्या स्तरापर्यंत मिळत नाही. त्यामुळे पक्ष कमजोर होत असल्याची स्पष्ट जाणीव काही आमदारांनी पक्ष नेतृत्वाला करून दिली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नव्या नेतृत्वात दुफळी माजल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या सर्व मंत्री, आमदार, खासदारांची बैठक आयोजित केली होती.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह सुमारे ३५ आमदार बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत पक्षबांधणीसह राज्यातील भीषण दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा झाली. सुनील तटकरे यांनी आमदारांना दुष्काळी भागांचे दौरे करण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पक्ष सत्तेत सहभागी असूनही आमदारांची कामे होत नसतील, तर त्याचा परिणाम पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर होईल. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील विभागांमध्ये कामे मार्गी लागत नसल्याने मतदारसंघात उत्तर देणे कठीण होत आहे, अशी तक्रार आमदारांनी केली. तक्रारींची दखल घेत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या विषयांवर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील यांनी वित्त आणि नियोजन खाते पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. महायुतीतील घटक पक्षांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक आमदारांनी मांडल्या. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये तसेच त्यांच्या मंत्र्यांकडून कामे होत नसल्याची नाराजी बहुतांश आमदारांनी व्यक्त केली.
बैठकीत आमदारांना त्यांच्या अडचणी आणि भावना मांडण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केले. वरिष्ठ नेत्यांमधील वादाच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्या तरी त्यामागील नेमक्या घडामोडींबाबत आमच्यापर्यंत कोणतीही माहिती पोचत नाही, अशी खंत काही आमदारांनी व्यक्त केली.