मुंबईः बोरिवली येथील बेस्ट बस डेपोसाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्देशांचे पालन होईपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा पगार रोखून धरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिक वेळ देण्याची बीएमसीची विनंती फेटाळून महापालिकेला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि विलंबाबद्दल आयुक्तांना अवमान नोटीस बजावली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे, की आयुक्तांनी १३ नोव्हेंबर २०२५ आणि २८ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. या निर्देशांचे पालन होईपर्यंत वेतन वितरित करण्यात येऊ नये याची खात्री करण्याचे निर्देश, महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीला देण्यात आले आहेत.
हे प्रकरण बोरिवलीतील ५,८०० चौरस मीटरच्या भूखंडावरील अतिक्रमणाशी संबंधित आहे, ज्यापैकी ३,४०० चौरस मीटर जागा बेस्ट बस डेपो आणि प्रशासकीय इमारतीसाठी राखीव आहे. १३ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीला पराग कन्स्ट्रक्शन्सकडून जमिनीचा ताबा घेण्याचे, अतिक्रमण हटवण्याचे आणि बस डेपोचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
हे प्रकरण पुन्हा २८ जुलै, २०२६ रोजी सुनावणीसाठी आले. त्यावेळी न्यायालयाने महापालिकेला अतिक्रमण हटवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत पाळण्यात आलेल्या अपयशानंतर ही नवीनतम अवमान नोटीस बजावण्यात आली आहे.
बीएमसीतर्फे हजर असलेले ज्येष्ठ वकील आर. पी. भट यांनी खंडपीठाला सांगितले, की अतिक्रमण करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी दोन संधी देण्यात आल्या आहेत. महापालिकेने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून अंतिम आदेश देणे बाकी आहे. भट यांनी दिवाणी न्यायालयाच्या एका निर्देशाचाही संदर्भ दिला, ज्यात रहिवाशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यांना बाहेर काढू नये, असे म्हटले आहे.
खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी प्रक्रिया पूर्ण होण्यास झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीएमसीच्या प्रतिज्ञापत्रातील या स्पष्टीकरणावरही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले, की संबंधित अधिकाऱ्याला मराठी येत नसल्यामुळे मराठी कागदपत्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करणे आवश्यक झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यास अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते, असा इशारा सरन्यायाधीशांनी दिला. बीएमसीच्या वकिलाने ३० दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दर्शवल्यानंतरही, खंडपीठाने अधिक वेळ देण्यास नकार दिला.